निवडणुकीला उरले 40 दिवस : जळगाव-रावेरात आघाडीचा उमेदवार ठरेना !

समोर येत असलेल्या नवनवीन नावांमुळे कार्यकर्ते अधिकच संभ्रमात


40 days left for the election: Jalgaon-Raverat Aghadi candidate is not determined! भुसावळ : जळगाव व रावेर लोकसभेसाठी भाजपाने उमेदवार जाहीर करून प्रत्यक्षात प्रचाराला सुरूवात केली असलीतरी आठवडा उलटूनही जळगावसह रावेर लोकसभेसाठी महाविकास आघाडीचा उमेदवार निश्चित होत नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम वाढला आहे. दररोज नवनवीन उमेदवारांची नावे समोर येवू लागल्याने उमेदवारी नेमकी कुणाला व कधी जाहीर होणार? असा प्रश्न कार्यकर्ते एकमेकाला विचारत आहे.

दररोज येताय नवनवीन नावे
आधीच प्रचाराला आता 40 दिवस उरले आहेत त्यातच उन्हाचे दिवस असल्याने प्रचार भल्या सकाळी व सायंकाळनंतर शक्य असल्याने कमी दिवसात एव्हढा मोठा मतदारसंघ पिंजून काढणे उमेदवारांसाठी जिकिरीचे ठरत असताना आता दोन्ही मतदारसंघात नेमका उमेदवार कोण ? हा एकच प्रश्न कार्यकर्ते एकमेकांना विचारताना दिसून येत आहेत.

जळगाव लोकसभेसाठी संधी कुणाला ?
जळगाव लोकसभेसाठी विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांचे तिकीट कापून स्मिता वाघ यांना पक्षाने संधी दिल्यानंतर त्यांनी संपर्क वाढवला आहे तर दुसरीकडे शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाकरे गटाकडून लोकसभेच्या निमित्ताने विधानसभेची चाचपणी सुरू झाली आहे. उमेदवार जाहीर करण्यापूर्वीच मतदारसंघ निहाय भेटीगाठीतून हालहवाल घेणारे संपर्क प्रमुख संजय सावंत आठवडाभरापासून मुंबईतच थांबून आहे. भाजपाचे खासदार उन्मेष पाटील यांच्या पत्नी संपदा पाटील यांना जळगाव लोकसभेतून आघाडीकडून संधी मिळणार असल्याची जोरदार चर्चा सुरूवातीला होती तर आता राष्ट्रवादीचे प्रमोद पाटील व चाळीसगावचे डॉ.उत्तमराव महाजन यांचे नाव पुढे आले आहे. दररोज नव-नवीन नाव पुढे येत असल्याने महाविकास आघाडीतील कार्यकर्ते संभ्रमात आहेत. उमेदवार जाहीर व्हायला जेवढा उशीर होईल तेवढी तयारी उशिरा ही चिंता निष्ठावान कार्यकर्त्यांना सतावत आहे.

रावेर लोकसभेबाबतही सस्पेन्स कायम
रावेर लोकसभेसाठी विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना पक्षाने संधी दिल्यानंतर त्यांनी प्रचाराला सुरूवात केली आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीकडून भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी यांचे नाव सुरूवातीला चर्चेत आले तर पुण्यात अ‍ॅड.रोहिणी खडसे यांच्यासह शिष्टमंडळाने अ‍ॅड.रवींद्र पाटील यांच्या नावाची शिफारस केल्यानंतर त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली मात्र त्यानंतर भाजपामध्ये दाखल झालेले उद्योजक श्रीराम पाटील यांनी शरद पवारांची भेट घेत खळबळ उडवून दिली. तिघा तूल्यबळ उमेदवारांपैकी एकाला उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

खडसे परिवार निवडणूक रींगणाबाहेर
रावेर लोकसभेसाठी मीच दावेदार असेल, असे सांगणार्‍या आमदार एकनाथराव खडसेंनी प्रकृती कारणास्तव निवडणुकीतून माघार घेतली तर त्यांच्या कन्या अ‍ॅड.रोहिणी खडसे यांनीदेखील विधानसभेसाठी इच्छूक असल्याचे सांगून लोकसभा निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे. आता 2 वा 3 एप्रिल रोजी महाविकास आघाडीकडून उमेदवाराची अधिकृतरीत्या घोषणा केली जाईल, अशी माहिती आतील राजकीय सूत्रांकडून वर्तवली जात आहे.


कॉपी करू नका.