सर्वात मोठी ब्रेकींग : आमदार एकनाथराव खडसे यांचा राष्ट्रवादीला ‘जय श्रीराम’

लवकरच होणार भाजपात प्रवेश खासदार रक्षा खडसेंच्या प्रचारासाठी मैदानात उतरणार !

0

गणेश वाघ

Biggest Breaking : MLA Eknathrao Khadse’s ‘Jai Shri Ram’ to NCP  भुसावळ : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथराव खडसे यांनी राष्ट्रवादी सदस्यत्वाचा राजीनामा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे पाठवल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. नाथाभाऊंनी भाजपात घरवापसी करण्याचा निर्णय गेल्या काही दिवसांपूर्वीच जाहीर केला होता. दरम्यान, एकनाथराव खडसे हे आता लवकरच भाजपात प्रवेश करतील हे स्पष्ट असून प्रवेशाचा मुहूर्त नेमका कधी? याबाबत मात्र अस्पष्टता आहे.

दिल्ली येथे लवकरच होणार प्रवेश सोहळा
सूत्रांच्या माहितीनुसार, केंद्रीय नेतृत्वाकडून बोलावणे आल्यानंतर आमदार खडसे यांचा दिल्लीतच भाजपामध्ये प्रवेश होईल. भाजपामधील अनेक जुने नेते व कार्यकर्त्यांशी चर्चा करताना त्यांनी आपल्याला भाजपामध्ये असायला हवे होते, अशी चर्चा केली होती मात्र आपण आपली राजकीय परीस्थिती त्यांना सांगितली होती मात्र आपला आता भाजपात जाण्याचा निर्णय झाल्याचे त्यांनी काही दिवसांपूर्वीच माध्यमांसोबत बोलताना सांगितले होते.

राष्ट्रवादीचा आपण ऋणी
अडचणीच्या काळात राष्ट्रवादीने आपल्याला प्रवेश दिला, आमदारकी दिल्याने आपण त्यांचे निश्चितच ऋणी आहोत. पक्षातून बाहेर पडण्यापूर्वी आपण राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी चर्चा केली आहे, त्यांना सर्व बाबी लक्षात आणून दिल्याचेही आमदार खडसे यांनी काही दिवसांपूर्वी आपली भूमिका मांडताना सांगितले होते.

होय स्वगृही परततोय : आमदार एकनाथ खडसे
आमदार एकनाथराव खडसे यांनी आपल्या घरवापसीवर शिक्कामोर्तब केल्यानंतर त्यांचे रविवार, 7 एप्रिल रोजी मुक्ताईनगरात आगमन झाल्यानंतर ‘ब्रेकींग महाराष्ट्र’शी बोलताना सांगितले की, भाजपा हे घर असून ते मी बांधले आहे. या घराच्या पायापासून माझे योगदान आहे. माझ्या घरातून मी नाराजीमुळे मी बाहेर पडलो मात्र आता माझी नाराजी दूर झाली आहे व लवकरच मी माझ्या हक्काच्या घरात परतत आहे. लवकरच आपण आपल्या घरी जाणार असून त्याबाबतची घोषणा आपण जाहीरपणे करू. असेही त्यावेळी आमदार खडसे म्हणाले होते.

राष्ट्रवादीला ‘अखेर जय श्रीराम’
नाथाभाऊंशी ‘ब्रेकींग महाराष्ट्र’ ने संपर्क साधला असता ते म्हणाले की, मी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा फार पूर्वीच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे दिलेला आहे, आज दिलेला नाही. ज्यावेळी पक्षाध्यक्ष शरद पवार आपला राजीनामा मागतील त्यावेळी आपण तो देवू, अन्य कुणालाही माझा आमदारकीचा राजीनामा मागण्याचा अधिकार नाही.

सुनेच्या विजयासाठी आता सासरे मैदानात
आमदार खडसे हे लवकरच आता भाजपात प्रवेश करण्याची शक्यता आहे. खासदार रक्षा खडसे यांच्या प्रचारार्थ आता आमदार खडसे रिंगणात उतरतील हे स्पष्ट आहे. गेल्या 40 वर्षांपासून राजकारणात असलेले आमदार खडसे आता सुनेच्या विजयासाठी कंबर कसणार असून अनेक राजकीय खेळ्या आता आगामी काळात पहायला मिळणार आहेत.


कॉपी करू नका.