काटेकोर नियोजनातून सर करता येईल स्पर्धा परीक्षेचा शिखर


प्रा.गोपाल दर्जी : कुसुंबा खुर्द येथे पोलिस भरती व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर

रावेर : तालुक्यातील कुसुंबा खुर्द येथे कुसुंबा ग्रामपंचायतीच्या वतीने नुकतेच पोलिस भरती व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर झाले. ग्रामीण भागातील युवकांनी स्पर्धा परीक्षेसाठी पुढे यावे यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत असल्याचे प्रास्ताविकात ग्रामपंचायत सदस्य मुबारक तडवी यांनी सांगितले. प्रमुख वक्ते गोपाल दर्जी यांनी आपल्या भाषणातून सांगितले की, स्पर्धा परीक्षेचे यशोशिखर सर करायचे असेल तर काटेकोर नियोजनाची सवय अंगी बाळगणे अत्यावश्यक आहे. तसेच हार्ड वर्क बरोबरच स्मार्ट स्टडी देखील यशाचा महत्त्वाचा भाग आहे. आपण ठरवलेले ध्येय आपण ज्या ज्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी लिहून ठेवावे. जेणेकरून आपल्याला आपल्या ध्येयाचा विसर पडणार नाही. ढीगभर वाचण्यापेक्षा जे महत्त्वाचे आहे तेच आपल्या वाचनात घेतले पाहिजे. त्याचप्रमाणे पोलिस भरती करता सकाळी लवकर उठून व्यायाम व संतुलित आहार आवश्यक असल्याचे प्रतिपादन गोपाल दर्जी यांनी केले.

विद्यार्थ्यांनी ग्रुप स्टडीला महत्त्व द्यावे : उद्योजक श्रीराम पाटील
समारंभाचे अध्यक्ष व श्रीराम ट्रीप समूहाचे उद्योजक श्रीराम पाटील यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांनी ग्रुप स्टडीला महत्त्व देणे आवश्यक आहे. समविचारी स्पर्धकांनी सोबत येऊन स्पर्धा परीक्षेची तयारी केल्यास यश हमखास मिळेल. ग्रामीण युवकांनी आपली धमक आज शहरी पातळ दाखवण्याची वेळ आहे तसेच गावकर्‍यांनी केलेल्या स्पर्धा परीक्षेची चळवळ करीता सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन देखील उद्योजक श्रीराम पाटील यांनी केले.


आई वडिलांनी मुलांना योग्य दिशा द्यावी : प्रा.पंकज पाटील
जागर प्रतिष्ठानचे अध्यक्ष व प्रमुख अतिथी प्रा.पंकज पाटील यांनी सांगितले की, अधिकारी होण्याचे स्वप्न सतत तेवत ठेवावे. पालकांची पाल्यास घडविण्यात खूप मोठी जबाबदारी असते. मुलांना योग्य दिशा द्या. मोबाईल आणि सोशल मीडियाच्या आहारी जाऊ देवू नका. विद्यार्थ्यांनीदेखील आवश्यक वाटल्यास ठराविक वेळच आपल्या हातात मोबाईल ठेवून इच्छित ध्येयाकडे मार्गस्थ झाल्यास स्पर्धा परीक्षा पास करता येत असल्याचे प्रतिपादन प्रा.पाटील यांनी केले.

ग्रामपंचायतीने सुरू केली स्पर्धा परीक्षा अभ्यासिका
ग्रामीण भागातील युवकांना दिशा मिळावी व स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक पुस्तके एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावी या उद्देशाने कुसुंबा खुर्द ग्रामपंचायतीने अभ्यासिका सुरू केली आहे. ग्रामीण भागातील युवकांनी अभ्यासातून आपल्या करीअर घडवावे या उद्देशाने अभ्यासिका सुरू केली असल्याचे सरपंच नुरजहा तडवी म्हणाल्या. आभार सेव्हन हिल्स प्रतिष्ठानचे अध्यक्ष विशाल राठोड यांनी मानले.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
व्यासपीठावर उद्योजक श्रीराम पाटील, दर्जी फाऊंडेशनचे संचालक गोपाल दर्जी, सरपंच नुरजहा तडवी, उपसरपंच सुरेश पाटील, जागर प्रतिष्ठानचे अध्यक्ष व रावेर येथील सौ.के.एस.ए.गर्ल्स हायस्कूल व ज्यु.कॉलेजचे प्रा. पंकज पाटील, युवा सेना शहर प्रमुख प्रवीण पंडित, शिक्षक सेना सदस्य प्रदीप पाटील, सदस्य मुबारक तडवी, बिस्मिल्ला तडवी, ग्रामसेवक बारेला आदी उपस्थित होते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !