उड्डाणपुलावरील छत्रपती शिवरायांचा नामफलक हटवताच मनसेतर्फे रस्ता रोको


भुसावळातील घटना : अज्ञातांकडून नाहाटा चौफुली उड्डाणपुलाचे छत्रपती शिवरायांच्या नावाने नामकरण

भुसावळ : राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचे एकीकडे वेगाने काम सुरू असतानाच निर्माण झालेल्या उड्डाणपुलांना राष्ट्रपुरूषांची नावे देण्याची मागणीही विविध पक्षांकडून प्रशासनाकडे केली जात आहे. दुसरीकडे शहरातील नाहाटा चौफुलीवरील उड्डाणपुलाला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव असलेला फलक मध्यरात्री अज्ञातांनी लावल्याने शहरात मोठी खळबळ उडाली. बुधवारी सकाळी पोलिस प्रशासनाला याबाबतची माहिती मिळताच त्यांनी नाम फलक हटवला तर यानंतर मनसेने पोलिसांच्या भूमिकेविरोधात आक्रमक पवित्रा घेत काही वेळा रस्ता रोको केल्याने वाहतूक ठप्प झाली होती.

पोलिसांनी काढला फलक
नाहाटा चौफुलीला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्याची मागणी सर्वप्रथम मनसे पदाधिकार्‍यांनी केली होती व त्यानंतर नगरसेवक पिंटू ठाकूर यांनीही याबाबतची मागणी करीत प्रशासनाला निवेदन दिले होते तर दोन दिवसांपूर्वी बौध्द समाज मंडळातर्फे उड्डाणपुलाला महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देण्याची मागणी प्रांताधिकार्‍यांना निवेदन सादर करून करण्यात आली होती. एकीकडे राष्ट्रपुरूषांची नावे पुलांना देण्यावरून विविध पक्षांकडून केली जात असताना दुसरीकडे बुधवारी मध्यरात्री अज्ञातांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव उड्डाणपुलाला देत तसा फलक लावल्याने शहरात खळबळ उडाली. बुधवारी सकाळी बाजारपेठ पोलिसांना माहिती कळताच त्यांनी धाव घेत फलक हटवला मात्र मनसेने पोलिसांच्या भूमिकेविरोधात रस्ता रोको आंदोलन केले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !