कवितेत मांडलेला माय-बाप समजून घेण्यासाठी संवेदनशील काळीज लागतं
अंतर्नादच्या पुष्पांजली प्रबोधनमालेत पुण्याचे कवी देवा झिंजाड यांचे भावोद्गार
भुसावळ : कविता म्हणजे अभिव्यक्त होण्याचं सशक्त माध्यम. कमी शब्दात अतिशय मोठा आशय या साहित्य प्रकारातून मांडला जातोे. तुमच्या-आमच्या काळजात दाबलेला उमाळा म्हणजे कविता होय. कवितेत मांडलेला माय-बाप समजून घेण्यासाठी संवेदनशील काळीज लागतं, असं परखड मत पुण्याचे कवी देवा झिंजाड यांनी व्यक्त केले. भुसावळच्या अंतर्नाद प्रतिष्ठानने स्व.पुष्पा वसंतराव पाटील यांचे स्मरण करण्यासाठी तीन दिवसीय पुष्पांजली ऑनलाइन प्रबोधनमाला आयोजित केली आहे. त्यात मंगळवारी ‘माय-बापाच्या कविता’ या विषयावर प्रथम पुष्प गुंफताना ते बोलत होते.
रसिकांच्या काळजाचा ठाव घेणार्या कवितांचे सादरीकरण
कवी म.भा.चव्हाण यांच्या ‘आई उन्हाची सावली आई सुखाचे नगर, निळ्या आकाशाऐवढा तिच्या मायेचा पदर’ आणि कवयित्री बहिणाबाई चौधरींच्या देरे देरे योग्या ध्यान… एक मी काय सांगते, लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते’ या कवितांनी त्यांनी व्याख्यानाला सुरुवात केली. संकटाचा पहाड फोडण्याची ताकद माय-बापांनी दिलेल्या संस्कारांच्या शिदोरीत असते. मात्र, अलिकडची टेक्नोसॅव्ही पिढीला मळकटलेली बंडी, फाटकं धोतर घातलेल्या बापासोबत चालायला अन् उभी राहायला लाज वाटते. पण हे चित्र बदलायला हवं, असा संदेशही त्यांनी स्वरचित कवितांतून दिला. संघर्ष, समाज, शिक्षण, व्यथा, वेदना, मायबाप, लेक असे नानाविध विषयांची गुंफण त्यांनी केली. ‘फुले’ नावाची कविता खर्जातील आर्जवात सादर करताना त्यांना गहिवरून आले होते. ‘मुंढावळ्यांचा फुलांचा स्पर्श…शेवटचा ठरला गं आई, त्यानंतर फुलांशी माझं नातचं तुटलं गं बाई’ या ओळीतून लेकीबाळींना सासुरवास कसा होतो हे मांडले. त्यातील प्रत्येक शब्द हा रसिकांच्या काळजाचा ठाव घेणारा ठरला. त्यानंतर त्यांनी ‘मायबाप’ कवितेतील ‘ऋण आईच्या गर्भाचे या जन्माचं फेडावं, आई-बापाच्या सावलीत हिरव्य कोंबाने वाढावं’ या ओळी सादर करून व्याख्यानाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं.दरम्यान, या प्रबोधनमालेने भुसावळ शहराच्या सांस्कृतिक वैभवात, लौकीकात नक्कीच भर पडेल. सशक्त अशी एक समृद्धशाली वैचारीक चळवळ या माध्यमातून उभी राहत असून ती पथदर्शी आहे, असे गौरवोद्गारही त्यांनी व्याख्यानातून काढले.

आईच्या संतापात असतं प्रेमाचं अत्तर
माय या दोन अक्षरी शब्दात संकटांचं वादळ पेलण्याची क्षमता आहे. तिचं मुलं उन्हात उभं असेल तर ती ‘इकडे मर सावलीत’ असं संतापात म्हणते. ती जो मर शब्द वापरते तो म्हणजे प्रेमाचं अत्तर आहे. पोराला उन्हाच्या झळा लागू नये ही त्यामागची भावना असते. काळजाच्या तुकड्याशी काळजाने काळजीपूर्वक साधलेला तो संवाद असतो, असेही कवी झिंजाड म्हणाले. ‘आई जग दावणारी….आई हंबरणारी गाय, शिळपाख खाऊनही देई लेकरांना साय’ या कवितेतून त्यांनी आईची महती वर्णिली.
प्रबोधनामलेचं यंदा तृतीय वर्ष
पुष्पांजली प्रबोधनमालेचं यंदाचं तृतीय वर्ष आहे. सांस्कृतिक चवळव प्रवाहीत राहावी या उद्देशाने हा उपक्रम सुरू केला आहे, असे प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप पाटील यांनी प्रास्ताविकात नमूद केले. उपक्रमाासाठी जळगावचे बांधकाम व्यावसायिक अजय बढे यांचे पाठबळ लाभत आहे. सुत्रसंचालन योगेश इंगळे यांनी केले.प्रकल्पप्रमुख अमित चौधरी, समन्वयक प्रा. श्याम दुसाने, सहसमन्वयक आर.डी.सोनवणे यांच्यासह नियोजन समितीच्या सदस्यांनी परीश्रम घेतले.

