भुसावळात विनापरवानगी छत्रपती शिवरायांच्या नावाचा फलक लावला : 11 जणांविरुद्ध गुन्हा
संशयीत आरोपींमध्ये दोन नगरसेवकांसह मराठा समाज शहराध्यक्षांचा समावेश
भुसावळ : भुसावळातील नाहाटा चौफुलीवर विनापरवानगी छत्रपती शिवरायांचे नाव उड्डाणपुलाला असलेला नामफलक लावल्याप्रकरणी मराठा समाजाध्यक्षांसह 11 जणांविरुद्ध बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी पोलिस नाईक संदीप बाबूसिंग परदेशी यांनी फिर्याद दिली. बुधवारी सकाळी उड्डाणपुलाला छत्रपती शिवरायांचा नामफलक लावण्यात आल्याची घटना उघडकीस आली होती.
यांच्याविरुद्ध दाखल झाला गुन्हा
बाजारपेठ पोलिसांना गोपनीय सूत्रांनी नाहाटा चौफुली उड्डाणपुलाला छत्रपती शिवरायांचा नामफलक बुधवारी मध्यरात्री दिड वाजेच्या सुमारास लावल्याची माहिती कळवल्यानंतर सहा.निरीक्षक अनिल मोरे यांच्यासह सहकार्यांनी धाव घेतली असता मिळालेल्या माहितीत तथ्य आढळले तसेच हा नामफलक लावण्यात आल्यानंतर त्यासोबत छायाचित्रही काढण्यात आल्याने तो फोटा पोलिसांना मिळाल्यावरून संशयीतांची नावे निष्पन्न करण्यात आली. त्यानुसार मराठा समाजाचे शहराध्यक्ष किरण पाटील, नगरसेवक किरण कोलते, नगरसेवक महेंद्रसिंग (पिंटू) ठाकूर, देवा वाणी, योगेश जाधव, हर्षल ब्राह्मणे, सचिन पाटील, राहुल पाटील, श्रीकांत बरकले, किशोर पाटील, एकनाथ धांडे यांच्यासह अन्य पाच ते सात अनोळखींविरुद्ध विना परवाना डिजिटल बोर्ड लावल्याप्रकरणी महाराष्ट्र मालमत्ता विद्रुपीकरण अधिनियम 1995 चे कलम 3 व 4 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.


