भुसावळातील जळगाव व जामनेर रोडवरील 87 बॅनर हटवले


पोलिसांच्या पत्रानंतर अवैध बॅनरवर पालिका प्रशासनाची कारवाई

भुसावळ : शहरात सध्या बॅनरबाजीला ऊत आला आहे. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. अवैध बॅनरच्या प्रश्नी पोलिसांनी पालिकेला दिलेल्या पत्रानंतर अखेर कारवाईला सुरुवात झाली. पालिकेचे प्रशासकिय अधिकारी रामदास म्हस्के यांच्या पथकाने जामनेर व जळगाव रोडवरील बुधवारी दिवसभरात 87 अनधिकृत बॅनर व 35 झेंडे हटवले.

बॅनरमुळे वाहनधारकांचे लक्ष होते विचलित
भुसावळ शहर आणि अनधिकृत बॅनर हे समीकरणच झाले आहे. याबाबत पोलिस विभागाने पालिकेला शहरातील कायदा सुव्यवस्था अबाधीत ठेवण्यासाठी त्वरीत बॅनर काढावे असे सूचित करण्यात आले होते मात्र याकडे सातत्याने कानाडोळा झाला. मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांनी दिलेल्या आदेशानंतर बुधवारी प्रशासकिय अधिकारी रामदास म्हस्के यांच्या नेतृत्वात अनिल भाकरे, गोपाळ पाली, राजू चौधरी, जय पिंजाणी, संकिर्ण, आरोग्य, इलेक्ट्रीकल आदी विभागाच्या कर्मचार्‍यांनी संयुक्त कारवाई केली. पथकाने शहरातील जामनेर रोडवरील बाजारपेठ पोलिस ठाणे ते नाहाटा चौफुलीपर्यंतच्या मार्गावरील विना परवानगीने लावण्यात आलेले बॅनर काढण्याची कारवाई केली. यानंतर दुपारी शहरातील जळगावरोडवरील वाय पॉइंट ते काच बंगल्यापर्यंतच्या मार्गावरील बॅनर हटविण्यात आले. पालिका प्रशासनाकडून आता या मोहिमेत सातत्य ठेवण्यात येणार आहे. टप्प्याटप्प्याने संपूर्ण शहातील अवैध बॅनर काढले जातील. यापुढील काळात विना परवानगीने बॅनर लावणार्‍या व मुदतीनंतरही ते कायम ठेवणार्‍यांवरही कारवाई केली जाणार आहे. शहरातील बहूतांश दुकानदारांनी रस्त्यावर अतिक्रमण करुन बॅनरबाजी केली आहे. त्यांच्यावरही पालिका कारवाई करेल. यासोबत राजकिय पदाधिकार्‍यांकडून विना परवानगीने बॅनर लावले जाते, तसेच काही परवानगी घेतले बॅनर देखील मुदतीनंतर झळकत असतात. अशावरही पालिकेने आता कठोर करवाई करण्याचा इशारा दिला आहे.


बाजारपेठेतही हवी कारवाई
शहरातील जामनेररोड, यावलरोड, स्टेशनरोड, मुख्य बाजारपेठेतील मॉडर्न रोड, मरीमाता मंदिर परीसर, आठवडे बाजार आदी भागातही अवैध बॅनरमुळे विद्रुपीकरण वाढले आहे. पालिका प्रशासनाकडून केवळ मुख्य रस्त्यांवर कारवाई होते, यामुळे आता पालिकेने अंतर्गत बाजारपेठेतील रस्त्यांवरही कारवाई करणे अपेक्षीत असल्याचा सूर उमटत आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !