रावेरात शासकीय धान्य खरेदीत शेतकर्‍यांची पिळवणूक


रावेर तालुका काँग्रेस कमेटीची तहसीलदारांकडे तक्रार

रावेर : रावेरातील शासकीय धान्य खरेदी केंद्रावर शेतकर्‍यांची आर्थिक पिळवणूक केली जात असून मक्याला एका क्विंटल मागे 25 रुपये जास्त घेऊन बिनधास्त वरकमाई केली जात असल्याची तक्रार रावेर तालुका काँग्रेस कमेटीने तहसीलदार यांच्याकडे केली आहे. जिल्हाधिकार्‍यांनी या प्रकरणी लक्ष घालावे, अशी अपेक्षा शेतकर्‍यांमधून व्यक्त होत आहे. आधीच रावेरात शासकीय धान्य खरेदी केंद्र उशिरा झाले असून त्यातच शेतकर्‍यांची पिळवणूक सुरू असल्याने संताप व्यक्त होत आहे.

वरकमाई न थांबल्यास आंदोलन
शासकीय धान्य खरेदी केंद्रावर शेतकर्‍यांनी शासनाला मका विक्री केल्यास त्यांच्याकडून 25 रुपये अधिक क्विंटल मागे वसूल केले जात असल्याच्या तक्रारी माझ्याकडे आल्या. हा सर्व प्रकार आमदार शिरीष चौधरी यांच्या कानावर सुध्दा टाकला असून काँग्रेस पक्षाकडून तहसीलदार यांना निवेदनन सुध्दा देण्यात आले असून 25 रुपयांची वरकमाई न थांबल्यास आम्ही आंदोलन करणार असल्याचे काँग्रेस तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन यांनी सांगितले.


यांची होती उपस्थिती
तहसील प्रशासनाला निवेदन देताना आदिवासी जिल्हाध्यक्ष दिलरुबाब तडवी, नरेंद्र पाटील (चिनावल), रामदास लहासे, भरत कुवर, सेवादल शहराध्यक्ष प्रतीक खराले, महेश तायडे, संतोष पाटील, महेशचंद्र लोखंडे, रमेश कदम, महेंद्र पाटील, गणेश बोरणारे, फिरोज तडवी, गफूर तडवी आदी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

आतापर्यंत एक कोटी रुपयांचा मका खरेदी
रावेर तालुक्यातुन आतापर्यंत एक कोटी दोन लाख 34 हजार 200 रुपयांचा पाच हजार 532 क्विंटल मका खरेदी करण्यात आला आहे. शासनाने प्रती क्विंटल एक हजार 850 रुपये भाव निश्चित केला आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !