चुंचाळेतील बेपत्ता भावंडांचा विहिरीत आढळले मृतदेह


यावल : तालुक्यातील चुंचाळे शिवारातून बुधवारी दुपारी भावंडे बेपत्ता झाल्याप्रकरणी यावल पोलीस स्थानकात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी बेपत्ता बालकांचा शोध सुरू केला असताना दोघा बालकांचा गुरुवारी दुपारी त्यांच्याच शेतातील विहिरीत मृतदेह आढळल्याने तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. चुंचाळे येथील गायरान परीसरातील रहिवासी रवींद्र सावळे आणि उज्ज्वला सावळे या दाम्पत्याची रीतेश सावळे (वय 5) हितेश सावळे (वय 6) ही मुले बेपत्ता झाल्याप्रकरणी यावल पोलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. रीतेश व हितेश या चिमुरड्यांचा मृतदेह गुरुवारी दुपारी विहिरीत आढळल्यानंतर माता-पित्यांना मानसिक धक्का बसल्याने त्यांनी मोठा आक्रोश केला.

पोलिसांची घटनास्थळी धाव
घटनेची माहिती कळताच यावलचे पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, उपनिरीक्षक जितेंद्र खैरनार व सहा.पोलीस उपनिरीक्षक विजय पाचपोळे व सहकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. चिमुकले नेमके विहिरीत कसे पडले? याबाबत पोलिसांकडून अधिक चौकशी केली जात आहे. मयत चिमुकल्यांचा मनोरुग्ण काका यास पोलिसांनी चौकशीकामी ताब्यात घेतले आहे.



यावल पोलिसात अपहरणाचा गुन्हा
बुधवारी आपल्या आई-वडिलांच्या सोबत ही दोन्ही मुले शेतात गेली असताना बेपत्ता झाली होती. चुंचाळे शिवारासह नायगाव, सौखेडासीम आदींसह पंचक्रोशीत त्यांचा दुपारपासून शोध घेण्यात येत असला तरी ते मिळून न आल्याने चिमुकल्यांचे डील रवींद्र मधुकर सावळे (35, रा.चुंचाळे, ता.यावल) यांनी यावल पोलिसात फिर्याद दिल्यावरून अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, चिमुकल्यांचा मृतदेह विहिरीत आढळल्याने माता-पित्यांना मोठा मानसिक धक्का बसला आहे. चिंचोली ग्रामस्थांची शेतातील विहिरीजवळ मोठी गर्दी झाली आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !