पत्रकारांच्या प्रलंबित समस्यांबाबत नायब तहसीलदारांना निवेदन


राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाने समस्या सोडवण्याची व्यक्त केली अपेक्षा

मुक्ताईनगर : लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या पत्रकारांच्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी राष्ट्रीय विश्वागामी पत्रकार संघ मुक्ताईनगर-जळगाव यांच्या वतीने नायब तहसीलदार मुक्ताईनगर यांना निवेदन देण्यात आले.

विविध समस्या सोडवण्याची अपेक्षा
पत्रकारीता क्षेत्रात पत्रकार व अधिस्वीकृतीधारक पत्रकार असा भेदभाव केला जात असून तो अन्यायकारक असून सक्रिय पत्रकारिता करणार्‍या सरसकट सर्व पत्रकारांना अधिस्वीकृतीधारक पत्रकार म्हणून मान्यता द्यावी पत्रकार प्रवास करत असलेल्या वाहनांना टोल माफी मिळावी, कोरोना व्हायरस रोखण्यासाठी देण्यात येणारी लस पत्रकारांसाठी प्राधान्याने उपलब्ध करून द्यावी, शासकीय रुग्णालयात अधिस्वीकृतीधारक असो अथवा नसो पत्रकारांमध्ये भेदभाव न करता सर्व पत्रकारांना मोफत आरोग्य सुविधा व औषधोपचार करण्यात यावे, राज्यातील सर्व पत्रकारांना टोल माफी मिळावी व अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना शासनाच्या वतीने मिळणार्‍या सर्व सुविधा मिळाव्यात, राज्यातील सर्व तालुक्याच्या ठिकाणी पत्रकार भवन बांधून मिळावे, राज्यातील सर्व शासकीय इमारतीमध्ये स्वतंत्र पत्रकार कक्ष स्थापन करावे, युट्यूब न्यूज चॅनलची अधिकृत नोंदणी करून त्यांना पत्रकारीता क्षेत्रात सामावून घेणे, प्रत्येक तालुक्यात पत्रकार वसाहती निर्माण करून पत्रकारांना हक्काचे घर देण्यात यावे, वयोवृद्ध पत्रकारांना शासकीय व कर्मचार्‍यांप्रमाणे पेन्शन योजना लागू करावी, पत्रकारांना मोफत आरोग्य विमा,अपघाती विमा संरक्षण मिळावे, शासकीय नोकर्‍यांमध्ये पत्रकारांच्या कुटुंबातील व्यक्तींना प्राधान्य देण्यात यावे, राज्यातील शासकीय भूखंड पत्रकार बहुउद्देशीय संघांना सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी प्राधान्याने देण्यात यावे, राज्यातील प्रत्येक तालुक्यात व जिल्ह्यात पत्रकारांसाठी स्वतंत्र शासकीय विश्रामगृह उभारावे, शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेत पत्रकारांच्या कुटुंबियांना प्राधान्य मिळावे, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जीव धोक्यात घालून काम करणार्‍या सर्व पत्रकारांना शासनाच्या वतीने सन्मानीत करण्यात यावे, राज्यभरातील शासकीय विश्रामगृहाचा पत्रकारांना मोफत लाभ मिळावा, राज्यात वाळू माफिया व अवैध व्यावसायिक यांच्याकडून बातमीदारी करणार्‍या पत्रकारांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी कडक कारवाई करण्यात यावी, धुळे जिल्ह्यात वाळू माफियांच्या विरोधात दिलेल्या बातमीचा राग येऊन पत्रकार देवराम भिका पाटील यांच्यावर वाळू माफियांनी हल्ला केला याबाबत कडक कारवाई करण्यात यावी व पत्रकार देवराम पाटील यांच्या जीवितास धोका असल्याने त्यांना पोलीस संरक्षण मिळावे यासह अन्य मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.


यांची होती उपस्थिती
निवेदन देताना शाकीर शेख, किरण पाटील, राजेंद्र देशमुख, योगेश पाटील, कैलास कोळी, पंकज कपले, अक्षय काठोके, प्रमोद सौंदळे, सुनील पाटील, श्रीकांत पाटणकर, हेमंत पाटील, विलास सावकारे हे पत्रकार उपस्थित होते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !