p>

भुसावळ विभागात कोसळधारा कायम ; हतनूरचे 41 गेट पूर्णपणे उघडेच


तीन दिवसांपासून सूर्यदर्शन नाही ; यावल-रावेर तालुक्यातील शेतकर्‍यांमध्ये आनंदोत्सव

भुसावळ- भुसावळ शहर व परीसरात सलग तीन दिवसांपासून पाऊस मुक्कामी असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे तर हतनूर धरणाच्या पाणलोटक्षेत्रात पाऊस कायम असल्याने गुरुवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास धरणाचे उघडलेले 41 दरवाजे दुसर्‍या दिवशीही शुक्रवारी कायम उघडे ठेवण्यात आले असल्याचे सूत्रांनी सांगितले. पावसामुळे भुसावळ शहरातील अनेक जुन्या इमारतींसह घरांची पडझड झाली तर सखल भागात पाणी साचल्याने शहरवासीयांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.

रावेरसह यावल नद्यांना पूर : धरणांमध्ये वाढला जलसाठा
यावल शहरातील हडकाई-खडकाई (हरीता-सरीता) नद्यांना प्रथमच पूर आल्याने समाधान व्यक्त करण्यात आले तर पावसामुळे हरीपूरा धरण 75 टक्के भरले असून भोनक नदीला पूर आला तर सातपुड्यातील पावसामुळे मोर धरणात जलसाठा वाढल्याने धरणाचे दरवाजे उघडण्यात आले असून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे शिवाय निंबादेवी धरणदेखील फुल्ल भरल्याने शेतकर्‍यांमध्ये आनंद पसरला आहे. जलक्रांती अभियानातून झालेल्या कामांमुळे शेतशिवारातील विहिरींची जलपातळी वाढल्यानेही शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे लहर पसरली आहे.

हतनूरचे 41 दरवाजे उघडेच
हतनूर धरणाचे संपूर्ण 41 दरवाजे पूर्णपणे उघडे असून तापी नदीला पूर कायम असल्याने काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हतनूरच्या पाणलोटक्षेत्रातील गोपाळखेडा, लोहारा, देडतलाई, टेक्सा, चिखलदरा व बर्‍हाणपूर आदी सर्व पर्जन्यमापक स्थानकांवर शुक्रवारी सकाळी सात ते शुक्रवारी सकाळी सात 24 तासांमध्ये 73 मिलीमीटर पाऊस झाल्याचे सूत्रांनी सांगितले. शुक्रवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास धरणाची लेव्हल 210.600 मीटर तर साठा 220.40 क्यूमेक्स (33.33 टक्के) असल्याचे सूत्रांनी सांगितले.


कॉपी करू नका.