भाजपाच्या जनआक्रोश मोर्चाने जळगाव दणाणले
जळगाव : हजारो शेतकर्यांच्या सहभागाने जळगावात सोमवारी भाजपाने मोर्चा काढला. यावेळी लोकप्रतिनिधींनी आघाडी सरकारच्या कार्यपद्धत्तीवर जोरदार टिका केली. भाजपकडून जिल्हाधिकार्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
यांनी केले मोर्चाचे नेतृत्व
माजी मंत्री आमदार गिरीश महाजन, आमदार मंगेश चव्हाण, आमदार राजूमामा भोळे, भुसावळचे आमदार संजय सावकारे, खासदार उन्मेष पाटील, खासदार रक्षा खडसे, जि.प.अध्यक्षा रंजना पाटील, आ.चंदुभाई पटेल, माजी आमदार स्मिता वाघ आदींनी या मोर्चाचे नेतृत्व केले. कोर्ट चौकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून भाजपच्या शेतकरी मोर्चाला प्रारंभ झाला. आजचा भाजपचा जनआक्रोश मोर्चा महाविकास आघाडी सरकारविरोधी घोषणांनी दणाणला होता. पालकमंत्र्यांनी 3 दिवसांपूर्वी केलेला दावा खोडून काढत आमदार गिरीश महाजन यांनी जिल्ह्यात शेतकर्यांना एक रुपयाही भरपाई मिळाली नसल्याचा पुनरुच्चार केला. सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेला शेतकर्यांचा जनआक्रोश मोर्चा प्रचंड यशस्वी झाल्याचा दावा भाजपने केला आहे . या वास्तवावरून तरी सत्ताधारी नेत्यांनी बोध घ्यावा असा टोमणा मारत आयोजकांनी सरकारच्या उदासीनतेवर बोट ठेवले.
आघाडी सरकारचे जुलूम इंग्रजांसारखे : आमदार मंगेश चव्हाण
मोर्चेकर्यांसमोर बोलताना महाविकास आघाडीच्या सरकारचे जुलूम इंग्रजांसारखे आहेत. यांनी फक्त मोठ्या गोष्टी केल्या. पालकमंत्री गुलाबराव पाटील काहीतरी करतील, असे वाटले होते मात्र यंदा शेतकर्यांची दिवाळी गोड नाही. दिवाळी सोडून येथे शेतकरी सरकारच्या मढ्यावर आले आहेत. आता आंदोलनाची तीव्रता वाढवावी लागेल, असा घणाघात आज आमदार मंगेश चव्हाण यांनी आज शेतकरी मोर्चामध्ये केला. खासदार उन्मेष पाटलांनी आज शेतकरी मोर्चात पालकमंत्र्यांवर टीका केली. राष्ट्रवादीच्या नादी लागून या शिवसेनेच्या वाघाची शेळी झाली असल्याचे ते म्हणाले यावेळी खासदार रक्षा खडसे, आमदार राजूमामा भोळे यांचीही भाषणे झाली.
सक्तीची वीज बिल वसुली थांबवावी
खरीप हंगामाच्या शेवटी आणि रब्बी हंगामाच्या सुरुवातीला शेतीला पाण्याची गरज असताना शेतीसाठी असलेल्या वीज जोडण्या सक्तीच्या वीज बिल वसुलीसाठी कापल्या जात आहेत. ही सक्तीची वसुली तत्काळ थांबवावी. शेतीसाठी वीजपुरवठा करणारे नादुरुस्त ट्रान्सफार्मर्स तात्काळ बदलावेत, रात्रीपेक्षा दिवसा नियमित शेतीसाठी वीजपुरवठा व्हावा, अतिवृष्टीग्रस्तांना दिलेली तुटपुंजी मदत तत्काळ वाढवावी . पीक विमा योजना 2021 अंतर्गत कापूस , उडीद , मूग , सोयाबीन उत्पादक पात्र शेतकर्यांना तात्काळ लाभ द्यावा 2019 आणि 2021 सालातील शेतीची नुकसान भरपाई तात्काळ द्यावी, अशा मागण्या या निवेदनात नमूद करण्यात आल्या आहेत.
यांच्या निवेदनावर स्वाक्षर्या
या निवेदनावर आमदार गिरीश महाजन, आमदार मंगेश चव्हाण, आमदार राजुमामा भोळे, खासदार उन्मेष पाटील, भाजपचे महानगर अध्यक्ष दीपक सूर्यवंशी, प्रल्हाद पाटील, के.बी.साळुंखेख, विशाल त्रिपाठी, महेश जोशी, जयपाल बोदडे, नितीन इंगळे, चंद्रशेखर अत्तरदे, भगत बालाणी, राकेश पाटील, राजेंद्र घुगे पाटील, सोमनाथ पाटील, हर्षल पाटील, रवींद्र पाटील आदींच्या सह्या आहेत.
भुसावळात बायोडिझेलची अवैध विक्री : तिघा आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी



