भुसावळ पालिकेच्या सभागृहात 48 ऐवजी दिसणार 56 नगरसेवक
शहरासाठी आता 24 ऐवजी 28 प्रभाग : प्रस्थापितांची वाढली चिंता
भुसावळ : आगामी पालिका व महापालिका निवडणुकीसाठी सध्याच्या सदस्य संख्येत 17 टक्के वाढ करण्याचा निर्णय बुधवारी राज्य मंत्री मंडळाच्या बैठकीत झाला. त्यानुसार 17 टक्के सदस्य संख्या वाढली तर भुसावळ पालिकेतील नगरसेवकांची संख्या 48 ऐवजी 56 होईल. 24 ऐवजी 28 प्रभाग होतील. यामुळे प्रभाग रचना देखील बदलेल. परिणामी शहरातील सध्याची राजकीय समीकरणे बदलून प्रस्थापीत अडचणीत येतील.राज्यातील झपाट्याने वाढलेली लोकसंख्या तसेच नागरी विकास योजनांचा वेग वाढवण्याची गरज लक्षात घेऊन महानगरपालिका व नगरपरिषदांमधील निर्वाचित सदस्यांच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत झाला. दरम्यान, शासनाने यापूर्वी 2011 ची लोकसंख्या गृहीत धरुन निवडणुकीचे निर्देश दिले होते. त्यानुसार शहरातील प्रभाग रचनेत कोणताही बदल केला जाणार नव्हता. मात्र, आता मंगळवारच्या निर्णयानुसार नगरसेवक संख्या 8 ने वाढणार आहे. प्रभाग संख्या देखील चारने वाढून रचनेतही बदल होईल. यामुळे सध्याची राजकीय समीकरणे बदलणार असल्याने राजकारणातील अनेक मातब्बरांचे धाबे दणाणले आहे.
30 वर्षांत अशी बदलली नगरसेवक संख्या
वेळोवेळी झालेले शासकीय निर्णय व धोरणांमुळे शहरातील नगरसेवकांची संख्या सतत बदलत गेली. सन 1991 च्या सार्वत्रिक निवडणुकीत सिंगल वॉर्ड रचना होती. यावेळी 68 नगरसेवक जनतेतून, तर 6 स्वीकृत सदस्य होते. सन 1996 मध्ये 43 नगरसेवक व 4 स्वीकृत सदस्य होते. यानंतर सन 2001 मध्ये 43 नगरसेवक व लोकनियुक्त नगराध्यक्ष पद्धती होती. सन 2006 मध्ये 47 नगरसेवक व 5 स्वीकृत नगरसेवक, 2011 मध्ये चार सदस्यीय प्रभाग व 47 नगरसेवक होते. यानंतर 2016 मध्ये दोन नगरसेवकांचा प्रभाग अशी रचना होती. त्यानुसार 24 प्रभागातून 48 नगरसेवक व लोकनियुक्त नगराध्यक्ष निवडले गेले.


कोणाला होणार फायदा? प्रभाग रचनेत मिळेल उत्तर
नवीन निर्णयानुसार, शहरातील प्रभाग रचनेत बदल होणे क्रमप्राप्त राहील. सध्याच्या प्रभागातील काही भाग कमी होऊन दुसरे भाग जोडले जातील. यामुळे निवडणुकीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या इच्छुकांच्या तयारीवर पाणी फिरले आहे. मात्र, नवीन निर्णयामुळे सध्याच्या प्रभागांची व्याप्ती काही अंशी कमी होईल. याचा फायदा नेमका कोणाला होणार? याचे चित्र प्रभाग रचना झाल्यानंतर स्पष्ट होईल. सम संख्येचा नियम असल्यास 8 नव्हे पालिकेत एकूण 9 सदस्य वाढतील. मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार 17 टक्क्यांच्या हिशेबाने पालिकेतील सदस्यांची संख्या वाढल्यास सभागृहात 8 सदस्य वाढतील. यामुळे मतदारांमधून निवडून द्यावयाच्या एकूण नगरसेवकांची संख्या 56 होईल. पण, निवडणुकीत सम संख्या नसावी असा नियम शासनाने अध्यादेशात दिला तर 9 सदस्य देखील वाढू शकतात. यामुळे नगरसेवक संख्या 57 होऊ शकेल, असाही जाणकारांचा अंदाज आहे.
अध्यादेशानंतर येईल स्पष्टता
राज्य मंत्री मंडळात बुधवारी 17 टक्के सदस्य संख्या वाढीचा निर्णय झाला असला तरी, याबाबतच्या अध्यादेशानंतर अधिक स्पष्टता समोर येईल. चार ते पाच दिवसांत हा अध्यादेश काढला जाऊ शकतो. या अध्यादेशातील निर्देशानुसार पुढील प्रभाग रचना, सदस्य संख्या, प्रभागांची संख्या निश्चित केली जाईल. तूर्त, 17 टक्क्यांच्या हिशेबाने नगरसेवकांची संख्या 8 ने वाढेल, असे ठळक चित्र आहे.
मंत्रिमंडळ निर्णयानंतर राजकारण ढवळले
2011 ची लोकसंख्या गृहीत धरुन निवडणुकीचे निर्देश दिले होते. त्यानुसार शहरातील प्रभाग रचनेत कोणताही बदल केला जाणार नव्हता. मात्र, आता मंगळवारच्या निर्णयानुसार नगरसेवक संख्या 8 ने वाढणार आहे. प्रभाग संख्या देखील चारने वाढून रचनेतही बदल होईल. यामुळे सध्याची राजकीय समीकरणे बदलणार असल्याने राजकारणातील अनेक मातब्बरांचे धाबे दणाणले आहे.