भुसावळ विभागात रयतेच्या राजापुढे सारेच नतमस्तक

तिथीनुसार शिवजयंती उत्साहात : भुसावळात सहा मिरवणुकांसह दोन दुचाकी रॅलींनी वेधले लक्ष


भुसावळ : शहर व परिसरात रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज जयंती (तिथी नुसार) विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील रेल्वे स्थानकाजवळील तसेच टिंबर मार्केटमधील पुतळ्यास अभिवादनासाठी मध्यरात्रीपासून मावळ्यांची गर्दी उसळली होती. शहरात मध्यरात्री 12 वाजता जय भवानी जय शिवरायांचा जयघोष करण्यात आला व जोरदार आतषबाजी करण्यात आली. यावेळी चोख बंदोबस्त राखण्यात आला होता. जयंतीनिमित्त शहरातून सहा मिरवणुका काढण्यात आल्या तर दोन दुचाकी रॅली गुरुवारी सकाळी काढण्यात आल्या.

अश्वारूढ पुतळ्याला अभिषेक
गुरुवारी मध्यरात्री शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष तथा माजी प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी यांच्याहस्ते रेल्वे स्थानकासमोरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरूढ पुतळ्याला अभिषेक केल्यानंतर आरती करण्यात आली. रात्री अभिषेकाच्या वेळी गडकरी नगरातील लेझीम पथकाने लेझीम कला सादर केली. यावेळी डीजे वाद्य लावून त्यावर लेझीम खेळण्यात आली. रात्री मोंठ्या प्रमाणावर शिवप्रेमी व शिवजयंती उत्सव समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

शहरातून निघाल्या दोन रॅली
गुरुवारी सकाळी 9 वाजता शहरातील नाहाटा चौफुलीजवळ शिवजयंती उत्सव समितीतर्फे युवराज लोणारी यांनी मोटरसायकल रॅलीचे आयोजन केले. ही मोटर सायकल रॅली शहरातील प्रमुख मार्गाने काढण्यात आली. रॅलीत मोठ्या प्रमाणावर पदाधिकारी, कार्यकर्ते यांचा सहभाग होता. शहरातील गडकरी नगरातील शंभू राजे चौकातून नवनिर्माण मंडळद्वारा संचलित शंभू राजे ग्रुपतर्फे सकाळी 10 वाजता मोटरसायकल रॅली काढण्यात आली. ही रॅली विविध मार्गाद्वारे स्टेशन रोड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत आल्यानंतर तिचा समारोप करण्यात आला. यावेळी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी आमदार संजय सावकारे, ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र आवटे, गौरव आवटे, युवराज लोणारी, परीक्षीत बर्‍हाटे आदी उपस्थित होते.

मिरवणुकांनी फेडले डोळ्यांचे पारणे
भुसावळ शहरातील विविध भागातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेच्या मिरवणूका काढण्यात आल्यात. जामनेर रोडवरील हिरानगर भाग, बाजारपेठ पोलीस ठाण्याजवळील उंट मोहल्ला, पाटील मळ्यातील युवा संकल्प प्रतिष्ठान, नेब कॉलनीतील महाकाल प्रतिष्ठान, न्यू एरिया वॉर्डातील न्यू सब्जी मंडळ, स्वराज गृप आणि शनि मंदीर वॉर्डातून दीपक चौधरी यांनी मिरवणूका काढल्या होत्या. रात्री उशिरापर्यंत मिरवणुकांचा जल्लोष कायम होता.

डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मिडियम, सावदा
सावदा : डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मिडियम स्कूल, सावदा येथे राजे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची 394 वी जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस शाळेच्या मुख्याध्यापिका भारती महाजन यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. महाजन यांनी शिवचरीत्राची माहिती उपस्थितांना दिली. यावेळी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

वरणगाव येथे शिवरायांचा जयजयकार
भुसावळ : हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीनुसार जयंती निमित्ताने गोदावरी फाउंडेशनच्या संचालिका तथा भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष डॉ.केतकी पाटील यांनी गुरुवारी वरणगाव येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. हृदयविकार तज्ज्ञ डॉ.वैभव पाटील, माजी नगराध्यक्ष सुनील काळे, सहा.निरीक्षक भरत चौधरी, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद भैसे, ऋषीकेश महाजन, प्रवासी संघटनेचे अध्यक्ष नाना चौधरी, अ‍ॅड.ए.जी. जंजाळे, राजेश चौधरी, सुशील झोपे, गोलू राणे, अनिल वंजारी, रमेश पालवे, मयूर शेळके, विवेक चौधरी, लिलाधर चौधरी, दीपक चौधरी, तेजस जैन, फझल मोहम्मद, अजमल खान, मुस्लिम अन्सारी, साबीर कुरेशी, राजा अलीम, दादू पालवे, भूषण माळी, कृष्णा पाटील, अश्फाक काजी आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मनसे, भुसावळ
भुसावळ : श्री महाराणा प्रताप चौक मनसेतर्फे तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी साजरी करण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज जयंती समिती अध्यक्ष युवराज लोणारी यांच्याहस्ते प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. शहर पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे आणि जिल्हा उपाध्यक्ष विनोद पाठक यांच्याहस्ते आरती करण्यात आले. यावेळ तालुका सचिव विलास कोळी, शहराध्यक्ष राहुल सोनटक्के, दशरथ सपकाळे, शिवा वाढे, प्रणय भागवत, कुणाल वारके, तुषार वाडे, वैभव बोरनारे, महेंद्र ब्राम्हणे, तुषार कोळी, आदित्य साळुंखे, चेतन सोलाखे, प्रतीक भंगाळे, विशाल ठाकूर, धनेश पाटील, भूषण कोळी इत्यादी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.


कॉपी करू नका.